सामाजिक समता सप्ताहामध्ये महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपू
संविधान उद्देशिकेच्या वाचनाने सामाजिक समता सप्ताह आजपासून प्रारंभ
गोंदिया, दि.8 अप्रैल: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे प्रारंभ आजपासून झाले असून या सामाजिक सप्ताहाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपू आणि नागरिकांपुढे आणू, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किशोर भोयर यांनी आज कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केले. आज संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर आणि इतर मागासवर्गीय विभागाच्या अधिकारी श्रीमती कीर्तीकर मंचावर उपस्थित होत्या. आजपासून सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात झालेली असून हा सप्ताह 14 एप्रिलपर्यंत असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करत समाजात एकात्मता निर्माण करण्याचे कार्य केले. राज्यघटनेतील कलम 46 मध्ये समाजातील दुर्बल घटक, विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी राज्याने विशेष प्रयत्न करावेत, तसेच त्यांना सामाजिक अन्याय व शोषणापासून संरक्षण द्यावे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या तत्वांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व जनजागृती व्हावी, या उद्देशाने ‘सामाजिक समता सप्ताह’ आयोजित केला जातो.
यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष उल्लेख केला होता, त्यानुसार या सामाजिक सप्ताहामध्ये या महापुरुषांचे कार्यक्रम समाहित केलेले आहेत.
*असे असणार सामाजिक सप्ताहाचे कार्यक्रम*
यावर्षीच्या सप्ताहात पत्रकार परिषद, नऊ तारखेला विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृह, निवासी शाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तसेच वर्ष 2026 हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे महाड येथील सत्याग्रह संबंधी व त्या अनुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन केले जाईल. यासह संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्यान, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत कार्यालय, शासकीय निवासी शाळा, वस्तीगृह येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार.
10 एप्रिलला राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेचे प्रमाणपत्र वाटप. जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण. मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान कार्यशाळा. महिला मेळावा- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांकरिता केलेले कार्य व महिला सशक्तिकरण याबाबत मार्गदर्शन सत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे क्षमता आणि कौशल्य वृद्धी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
11 एप्रिलला हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असून जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येईल. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य याविषयी विविध स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या निवडक वस्तीतील प्रत्येक कुटुंबात भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका याची प्रत वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
12 एप्रिलला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या निवडक वस्तीतील प्रत्येक कुटुंबात भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका याची प्रत वितरित करणे. तसेच निवासी शाळेच्या प्रवेशिकाकरिता प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
13 एप्रिलला जादूटोणाविरोधी कायदा कार्यशाळा, अण्णाभाऊ साठे नगर पूर्वा येथील मांग गारोडी समाजाच्या 25 घराचे सामूहिक लोकार्पण/ गृहप्रवेश सोहळा सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता दिंडीचे आयोजन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे समारोप कार्यक्रम असणार आहे.
या कार्यक्रमातून सामाजिक समता नागरिकांमध्ये निर्माण व्हावी याचा प्रयत्न करणार असल्याचे किशोर भोयर यांनी सांगितले. या सामाजिक समता सप्ताहामध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून महापुरुषांना आणि त्यांच्या कार्यांना अभिवादन करावे, असे आवाहन श्री. भोयर यांनी केले.




















No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.